Updated: Jan 13, 2023
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दुष्काळावर लोकसहभागातून भगीरथ प्रयत्नाने मात करीत जलश्रीमंत झालेल्या जाखले गावाने एक नवा वस्तुपाठ दुष्काळी गावांसमोर ठेवला आहे. सोबतच आता विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुद्धा हे गाव आता परिसरातील जनतेचे लक्ष वेधून घेते आहे. महिला सन्मानाचा जागर करणाऱ्या एका अनोख्या अशा उपक्रमामुळे हे गाव लक्ष वेधून घेत आहे. गावाच्या सुजलाम-सुफलाम होण्याच्या प्रयत्नांसोबतच जाणून घेऊयात महिला सन्मानाच्या अनोख्या जागराविषयी...
सुपीक मातीतली हिरवीगार शेती आणि मातीत राबून सोनं पिकवणारा सधन शेतकरीवर्ग असलेला जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. इथला पन्हाळा म्हणजे स्वराज्यावरील निष्ठा आणि शौर्याच्या पराकाष्ठेचं प्रतीक. याच पन्हाळा तालुक्यातील जोतिबाच्या डोंगररांगेत त्याच्या कृपाछत्राखाली नांदणारं १०२४ हेक्टर क्षेत्रफळाचं जाखले गांव. गावापासून जवळची नदी म्हणजे वारणा; पण तीही थोडी दूरच. त्यामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमचाच. उन्हाळ्यात तर आणखी तीव्र. या प्रश्नावर गावातच तोडगा काढत जलसंधारणाची कामे पूर्णत्त्वास नेत गाव सुजल करून हा प्रश्न कायमसाठी निकालात काढण्यात गावाने यश मिळवलं आहे. तेही नदीपासून गावापर्यंत पाईपलाईन आणण्याचा खर्च टाळून. नदीचे पाणी फक्त शेतीसाठी वापरले जाते. सततचे प्रयत्न आणि चिकाटी याच गुणांमुळे पाणी कठीण खडक फोडून मार्ग काढते. पाण्याच्या याच गुणांचे अनुकरण करून जाखले गावाने गावातला पाण्याचा अभाव दूर केला आहे. जाणून घेऊ या सुजलाम सुफलाम जाखले गांवाची गोष्ट.
कोणत्याही राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर जाखले गाव येत नाही. त्यामुळे इथे यायचे तर थोडी वाट वाकडी करूनच यावे लागते. पण, इथली हिरवाई आणि जोतिबा मंदिराशी साधर्म्य सांगणारं श्री गोपालेश्वर महादेवाचं मंदिर हे श्रम नक्कीच विसरायला लावतील. गावच्या गुराखी मुलांनी शोधलेला हा जागृत महादेव, म्हणून याचं नाव गोपालेश्वर. गावाच्या जलसंधारणाचा इतिहास आपल्याला ५० वर्षे मागे नेतो. १९७२ च्या दुष्काळामध्ये गावात ३४० मीटरचा कुरण पाझर तलाव आणि ४४० मीटरचा माने पाझर तलाव हे दोन तलाव घेण्यात आले. पण अनियमित आणि अत्यल्प पावसाने ते कोरडे पडायला लागले आणि दुर्लक्षित होत गेले; तसे काही काळात ते पूर्णत: गाळाने भरुन गेले. जाखले गावाचा दुष्काळ आणखी तीव्र झाला. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तापला. त्यावर मात करण्यासाठी जुलै २०१५ मध्ये सरपंच सागर माने यांनी गावातील तरुणांच्या सक्रीय सहभागाद्वारे गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. लोकसहभाग आणि जलयुक्त शिवार अभियानातून गावाच्या शिवारात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब-न-थेंब जलसंधारण प्रणालीद्वारे अडवून तो भूगर्भात मुरविल्याने जाखले गावात आज सुमारे ६०० टीसीएम पाणीसाठा झाला आहे आणि जाखलेच्या शिवारात हिरवीगार पिके डौलू लागली आहेत.
हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांनी गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीचा प्रारुप आराखडा तयार केला. गावातील दोन्ही पाझर तलावांचे पुनरूज्जीवन करणे, गावातील दोन मोठ्या ओढ्यांवर जागोजागी साखळी सिमेंट बंधारे घेणे, डोंगर उतारावरील ओघळ जोडणी प्रकल्प, सीसीटी, वनतळी घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी ग्रामसभेची मंजुरी घेऊन केवळ जलयुक्त शिवारचा ध्यास घेऊन काम सुरु झाले. गावातील पाझर तलाव, ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे महत्वाकांक्षी प्रकल्प शासन योजना आणि लोकसहभागातून राबविण्यात आले. जवळपास ११ हजार ट्रॉली गाळ लोकसहभागातून काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला. त्यामुळे ओढ्यामध्ये चांगला पाणीसाठी निर्माण होण्याबरोबरच शेतकऱ्यांना शेतीसाठी चांगल्या दर्जाची माती मिळाली. त्यामुळे पिकेही चांगली येऊ लागली. असा दुहेरी लाभ जलयुक्त शिवार अभियानाद्वारे शेतकऱ्यांना मिळाला.
जलयुक्त शिवार अभियानातून सुमारे साडेचार कोटींची कामे शासन योजना आणि लोकसहभागातून झाल्याने जवळपास ६०० टीसीएम इतका पाणीसाठा जाखलेच्या शिवारात होऊ शकला. यामध्ये पाझर तलावांची दुरुस्ती, ओढ्याचे खोलीकरण, रुंदीकरण आणि १६ सिमेंट नालाबांध, २ वनतळी, १०० ल्यूज बोल्डर तसेच २४ हेक्टरवर सीसीटी अशा जलसंधारणाच्या प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी करुन दुष्काळी गावाचे सधन बागायती गावात रूपांतर करण्याच्या गावकऱ्यांच्या विशेषत: गावातील तरुणांच्या प्रयत्नांना जलयुक्त शिवार अभियानाची फार मोठी साथ मिळाली असल्याचे सरपंच सागर माने अभिमानाने सांगतात.
इथे डोंगरात पाऊस भरपूर पडत असला तरी पाणी वाहून जात असल्यामुळे वर्षभर पिण्यासाठी पाणी मिळवणे हेच मोठे आव्हान असे. पावसाचे पाणी इथे डोंगरातच अडवून, जिरवून गावाची तहान भागवण्याचा उत्तम आणि यशस्वी प्रयत्न इथे झालेला दिसतो. गावानजीकचा साडेचार किलोमिटर्स अंतराचा डोंगरउतार असून या डोंगरावर असंख्य ओघळी आहेत. अशा या भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन या डोंगरपट्यात ओघळ जोड कार्यक्रम राबवून आज गावालगतच्या डोंगरात सुमारे २००० कोटी लिटर पाणी अडवले आणि साठवले जाते. हेच पाणी पूर्वी फक्त डोंगरउतारावरून वाहून जात असे. पावसाचे पाणी जिरवल्यामुळे भूजल पातळी वाढली आणि विहिरींमधील नैसर्गिक झरे खळाळून फुटले. त्याच बरोबर गावातील विहिरींच्या वरच्या स्तरावर तलाव बांधून त्यात पाणी साठवले गेले. हेच पाणी विहिरीत येते आणि नळांमार्फत प्रत्येक घरी पाणीपुरवठा केला जातो.
जाखले गावाच्या जलसंधारणाच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे नदीतील अशुद्ध पाणी गावापर्यंत आणण्यापेक्षा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा १०० टक्के पावसाच्या नैसर्गिक स्रोतावर अवलंबून राहून सोडवण्यात आला आहे. गावातीलच विहिरी आणि तलावांमधून पाणी आणणे कमी खर्चिक तर आहेच शिवाय हे पाणी नैसर्गिक भूमिगत झऱ्यांचे आणि पावसाचे असल्याने ते दूषित असण्याचा धोकाही तुलनेने कमी असतो. कारण, या जलस्रोतांमध्ये पाणी अशुद्ध करणारे मोठे घटक म्हणजे सांडपाणी, कारखान्यांमधून वाया जाणारे रासायनिक घटक मिसळलेले पाणी मिसळले जात नाही. म्हणूनच नदीच्या पाण्यापेक्षा हे पाणी जास्त सुरक्षित आहे.
शासनाच्या वसुंधरा पाणलोट योजनेचा पुरेपूर लाभ घेऊन जलसमृद्ध झालेले जाखले गांव इतर सोयीसुविधांमध्येही लक्षणीय प्रगती करत आहे. संपूर्ण गावात एकही कच्चा रस्ता तुम्हाला दिसणार नाही. गावातल्या प्रत्येक घराला ड्रेनेज कनेक्शन दिले आहे. ग्रामस्वच्छतेचा ध्यास या गावाने घेतला आहेच. त्यासाठी मागील दोन वर्षांपासून जागतिक महिलादिनापूर्वीच एक आठवडा म्हणजे १ ते ७ मार्च या काळात संपूर्ण गावात स्वच्छतेचा जागर केला जातो. पूर्ण गावातील प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली लख्ख केली जाते आणि या कामात प्रत्येक गावकरी सहभागी होतो. मग अशा लख्ख झालेल्या गावातल्या प्रत्येक घराच्या अंगणात आठ मार्चला त्या घरातील गृहलक्ष्मीच्या हस्ते गुढी उभारली जाते. तो तिला दिलेला मान असतो. यावर्षी या दिवशी आणाखी एक अनोखा उपक्रम घेण्यात आला. महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन ही काही नवीन बाब नाही. पण इथे या स्पर्धेचा कॅनव्हास होता संपूर्ण गावातील सगळ्या घरांची अंगणे. आपापले अंगण जुन्या पद्धतीने शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढायची होती. या कल्पनेमुळे प्रत्येक घरातील एका तरी महिलेने या स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी सुमारे दहा सामाजिक विषय देण्यात आले होते. शिक्षणाचे महत्त्व, स्त्रीभ्रूणहत्या, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता अशा विषयांमधून एक विषय निवडून या महिलांनी सामाजिक संदेश देणाऱ्या सुंदर रांगोळ्या रेखाटल्या. 'अ पिक्चर इज वर्थ अ थाउजंड वर्ड्स' ही म्हण सार्थ ठरवत या रांगोळ्यांनी हातभर भाषणाने साध्य होणार नाही असा संदेश गावकऱ्यांना दिला. सागर माने सांगतात, "आमच्याच गावातील माय बहिणींच्या अंगात किती कलागुण आहेत याची जाणीव आम्हाला त्यादिवशी झाली."
याशिवाय आणखी एक आगळावेगळा उपक्रम गावात यावर्षी महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आला. गावामध्ये एकूण १५-१६ लहानमोठे चौक आहेत. या प्रत्येक चौकात एका सुप्रसिद्ध आणि कर्तृत्त्ववान महिलेची प्रतिमा मांडून त्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यात सुधा मूर्ती, सुनीता विल्यम्स, इंदिरा गांधी अशा विविध क्षेत्रांतील महिलांचा समावेश होता. विशेष म्हणजे गावातीलच तरुण मुली आणि महिलांनी या महिलांचे कार्य, त्यांचा जीवनप्रवास याबद्दल गावकऱ्यांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी त्यांनी पुस्तके वाचली. इंटरनेटवरून माहिती मिळवली. अभ्यास केला आणि धीटपणे गावकऱ्यांसमोर त्याची मांडणी वक्तृत्त्वातून केली. गावातील मुलींचा आत्मविश्वास, ज्ञान मिळवण्याची इच्छा, वाचनाची सवय आणि एखाद्या विषयाची तर्कसुसंगत मांडणी करण्याची सवय असे गुण वृद्धिंगत होण्यासाठी या उपक्रमाचा खूप उपयोग झाला. इतकेच नव्हे तर काहीतरी करू इच्छिणाऱ्या तरुण मुलींसमोर महिलांच्या कर्तृत्त्वाचे विविध मानदंड उभे राहिले. त्यातून अनेकींना प्रेरणा मिळाली असल्याचा विश्वास सागर माने यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता.
याच वेळी या गावातील, परंतु पुढे जाऊन आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करत आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या काही महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात आमच्या गावातील पहिली पीएसआय अधिकारी, इतिहासतज्ज्ञ, भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या अशा विविध क्षेत्रातील गुणवान महिलांचा समावेश होता. गावातील विद्यार्थिनींसमोर असे आदर्श उभे करून गावाने त्यांच्या मनात भविष्यातील भरारीचे स्वप्न पेरले आहे. पारंपरिक भारतीय वेषभूषांमध्ये सजलेल्या महिलांनी स्वच्छतेची मशाल फेरी काढून या दिवसाची सांगता केली. विजेचे दिवे बंद करून उजळलेल्या ज्योतींच्या प्रकाशातील तशाच उजळलेल्या मनाच्या महिलांनी काढलेली ही सायंफेरी गावासाठी अविस्मरणीय ठरली. केंद्र शासनाच्या संसद आदर्श गाव या योजनेमध्ये निवड झाल्यानंतर मा. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी जाखले गाव दत्तक घेतले. त्यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हा उपक्रम साकार झाला. इथून पुढे दरवर्षी महिलादिनाला असे कल्पक आणि अनोखे उपक्रम आयोजित करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे.
पाणीपुरवठा, रस्ते, वीज, सांडपाणी व्यवस्था, शाळा, क्रीडांगण इ. भौतिक जीवनातील सुविधांची साधने आहेत, ती आवश्यक आहेतच. परंतु, हे साध्य झाले म्हणजे गाव आदर्श ठरले असे होत नाही, तर गावातील तरुणांची, बालकांची मने सुसंस्कारित, संवेदनशील अशी घडवणे म्हणजे खरा विकास असे मानणारा सुशिक्षित आणि सुसंस्कृत सरपंच या गावाला लाभला आहे. सागर माने यांनी हे विचार केवळ बोलण्यापुरते न ठेवता कृतीत उतरवले आहेत. त्यासाठीच गावामधील अंगणवाडी बोलक्या भिंतींनी सजल्या आहेत. शाळा डिजिटल झाली आहे. शाळेत विद्यार्थ्यांसाठी लाईट्स नव्हते तिथे आता एलईडी दिवे उजळले आहेत. खेळाचे साहित्य, इ लर्निंग सुविधा, नव्या वर्गखोल्या अशा आजच्या काळाशी सुसंगत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पुढे जाऊन गावाची मुले म्हणून इथले विद्यार्थी करिअर आणि उच्च शिक्षणात मागे राहू नयेत म्हणून शक्य ते सगळे प्रयत्न गाव करत आहे. मुलांसह पालकांनाही शिक्षणाचे महत्त्व पटावे, मुलांच्या शाळेतील उपस्थितीत सातत्य राहावे यासाठी वर्षातून दोन वेळा होणारी पालकसभा दर दोन महिन्यांनी आयोजित केली जाते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनालय, जिम, कुस्ती संकुलाचे नूतनीकरण अशा सुविधा गावात उभ्या राहिल्या आहेत.
गावासोबतच गावालगतच्या लहान वाड्या वस्त्यांवरही सुधारणा होत आहेत. नाईकवस्तीसारख्या लहान आणि दुर्लक्षित वस्तीवरही चांगले रस्ते आहेत. कित्येक वर्षांपासून वस्तीवरील लोक स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत होते. ती सुविधाही आता पुरवण्यात आली आहे. तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून एक खुली अभ्यासिका तिथे तयार करण्यात आली आहे. लहानशा घरात अभ्यासासाठी पुरेशी जागा नसणारे विद्यार्थी तिथे मोकळ्या हवेत आपला अभ्यास, वाचन पूर्ण करू शकतात.
प्रगतीपथावर वाटचाल सुरु असताना अचानक जगावर आलेल्या कोविडच्या संकटाने गावालाही ग्रासले होते. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. किमान ६०-६५ गावकरी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यावेळी गावातच कोविड सेंटर उभारले गेले. सरपंच स्वतः हॉस्पिटलमध्ये असलेल्या लोकांच्या उपचारांची माहिती घेत होते, पाठपुरावा करत होते. गावात या विषाणूबाबत, त्यासंदर्भात घ्यायच्या खबरदारीबाबत जनजागृती केली जात होती. लोकांचा धीर सुटू नये, त्यांचे मनोबल कायम राहावे याची काळजी सर्वांनी मिळून घेतली. आज या संकटातून बाहेर पडल्यानंतर १०० टक्के लसीकरण पूर्ण करून गाव पुन्हा उन्नतीच्या मार्गावर पुढे निघाले आहे. या निसर्गसंपन्न टुमदार गावाला या वाटचालीत असेच यश मिळत राहो हीच शुभेच्छा!
