सुरेश उज्जैनवाल
(सल्लागार संपादक,ग्रामगौरव )

"जिवन, मानवी प्रतिष्ठेचा आदर,विचार,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर,यासह धर्म आणि विवेकाच्या स्वातंत्र्याचा सुद्धा आदर आह." असा आपल्या भूमिकेचा सिद्धांत सातत्याने मांडणारे मुस्लिम धर्मगुरू. मुफ्ती हारून एक उत्तम धार्मिक प्रवचनकार, निर्भिड पत्रकार, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता आणि सांसारिक व्यक्ती आहेत. जळगावच्या लोकप्रिय पण एक विचाराचे वादळ असलेल्या मुफ्ती हारून नदवी यांचा आज वाढदिवस. मुफ्ती साहेब आज वयाच्या ४५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तीमत्वाचा ग्रामगौरव प्रकाशनाने घेतलेला हा वेध...!
अल्पावधीत या व्यक्तीने आपल्या प्रभावी आणि वेगळ्या वक्तृत्व शैलीने आपला जबरदस्त ठसा आपल्या समाजात आणि विशेषतः समाजातील युवा वर्गात निर्माण केला आहे.केवळ भारतातच नव्हे तर मध्य पूर्वेच्या सौदी अरेबिया पर्यंत धार्मिक प्रवचनकार म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला आहे. भारतातील केरळ राज्य वगळता उर्वरित सर्व राज्यांमध्ये त्यांना मुस्लिम समुदायाकडून प्रवचनासाठी बोलावले जाते. आपल्या शब्दातील अचूकता, चढ -उतार आणि त्यामुळे त्यांची प्रसिद्ध झालेली प्रभावी वक्तृत्व यामुळे अल्पवधित ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. उर्दू,हिंदी,मराठी,इंग्रजी,अरबी आणि फारसी (पर्शियन ) या भाषा त्यांना अवगत आहेत. जळगांव जिल्ह्यातील रावेर ही त्यांची जन्मभूमी असून प्राथमिक शिक्षण रावेर येथे तर उर्वरित शिक्षण औरंगाबाद आणि उच्च शिक्षण त्यांनी लखनऊ येथे पूर्ण केले आहे. मुफ्ती हारून यांनी उर्दू आणि अरबी या भाषेत एम.ए .केले आहे. इस्लाम धर्माविषयीचा अभ्यास आणि गुणवत्ता बघून त्यांना मुफ्ती ही धर्मगुरूची पदवी १९९७ मध्ये बहाल करण्यात आली. तेव्हापासून त्यांनी धार्मिक प्रवचनकार म्हणून स्वत:ला समाजासाठी वाहून घेतले आहे.मुस्लिम धर्म गुरूंचा जिल्ह्यातील इतिहास पहाता ते पहिलेच धर्मगुरू असावेत,ज्यांची प्रवचने देश आणि देशाबाहेर ऐकली जातात किंवा त्यांना आमंत्रित केले जातात.

सर्वधर्मीय साधु -संत आणि मुनींशी जवळचे सबंध :
मुफ्ती हारून हे दिल्लीच्या राष्ट्रीय एकता सद्भावना मिशन सक्रिय सदस्य आहेत.राष्ट्रीय एकता मिशनच्या माध्यमातून विविध धर्मीय साधू,संत,मुनी यांच्या संपर्कात ते असतात. विशेषत: जैन मुनी कमल मुनिजी महाराज,बाबा सत्यनारायण दासजी,बलसाडचे (गुजरात) श्री.शिवजी महाराज, संभाजी शिर्के महाराज यांच्यासह दिवंगत भैय्युजी महाराज यांच्याशी ही घनिष्ठ संबंध होता.वढोदे (फैजपूर) येथे डिसेंबर २०२२ मध्ये संत जनार्दन स्वामी यांनी भरविलेल्या समरसता कुंभमध्ये संत जनार्दन स्वामी यांच्यासह देशभरातून व विदेशातून आलेल्या संत महतांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी या समरसता कुंभाला शुभेच्छा देऊन एक वेगळे उदाहरण प्रस्थापित केले होते.
युवकांमध्ये मुफ्ती साहेबांची आहे वेगळी क्रेझ -
मुफ्ती हारून केवळ धर्मोपदेशक नव्हे तर समाजातील युवका चांगले नागरिक कसे घडतील या साठी मार्गदर्शन करतात, विशेषत: शिक्षणा शिवाय प्रगती नाही हे ते आपल्या भाषणातून उत्तमरित्या पटवून देतात.समाजात वाढती व्यसनाधीनता हा त्यांच्या साठी चिंतेचा विषय असून धार्मिक शिकवणी बरोबरच व्यसन मुक्तीची चळवळ ही त्यांनी सुरू केली आहे. त्या साठी इस्लाम धर्माने कोणतेही अमली पदार्थ सेवन करणे निषिद्ध ठरविले आहे.आपला धर्म आज्ञाधरकपणा शिकवितो, आदर,प्रेम,परोपकार, शांतता, सुरक्षितता आणि सर्वांची समृध्दी हाच "इस्लाम"शब्दाचा शाश्वत अर्थ असल्याचे ते प्रवचनाच्या माध्यमातून पटवून देतात. त्यामुळे मुस्लिम युवकांचे ते आयडॉल सुद्धा आहेत.ईकरा युनानी मेडिकल कॉलेज मध्ये ते १४ वर्ष अध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवीत होते. आपल्या चार -चार महिने आगाऊ ठरलेल्या देश-विदेशातील व्यस्त कार्यक्रमात आपल्या पत्नी व मुलगी यांना फक्त आठवड्यात एक दिवस देणारा आणि इतर दिवशी समाजाला वाहून घेतलेला हा अवलिया मुळात एक सामाजिक अविष्कार आणि अनेक समाज जोडण्याची एक भेटच म्हटली पाहिजे.

व्हायरल न्यूजचे पत्रकार म्हणून उर्दूमध्ये आहे ख्याती -
मुफ्ती हारून नदवी गेल्या सात वर्षांपासून पत्रकारिता करीत आहेत.नदवी टाइम्स या नावाचे साप्ताहिक ते चालवतात. शिवाय त्यांनी ऊर्दू-हिंदीत सुरू केलेले स्वत:चे यु-ट्यूबवरील चॅनल आणि वेबपोर्टल कमालीचे लोकप्रिय आहे.त्यांच्या न्युज पोर्टलचे १५ लाख दर्शक असून कमी काळात नोंदविलेला हा एक विक्रमच आहे.ते स्वत: अँकरिंग करतात,बातम्या सांगतात.त्यांची देश विदेशातील बातम्या विश्लेषणसह सांगण्याची पद्धत फारच आगळी वेगळी असते.ते कागदावर बातम्या लिहून किंवा कोणत्याही टेली प्रोमप्टरवरुन वाचून -पाहून बातम्या सांगत नाहीत,तर घडलेल्या घटना, प्रसंगाचे वर्णन संवाद पद्धतीने करतात.विशेष म्हणजे ते आठवड्याचे पाच दिवस दौऱ्यावर, प्रवासात असतात,पण दैंनदिन बातम्या देण्यात कधी ही खंड पडला नाही.पत्रकारिता क्षेत्रातील त्यांची धडाडी लक्षात घेवून पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संदीप काळे यांनी त्यांना तीन वर्षांपूर्वी संघटनेच्या ऊर्दू विंगचे रराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.मुफ्ती हारून यांचा वाढदिवस १२ मार्च रोजी आहे. याच दिवसापासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सुरू होत आहे. ते अत्यंत मिळाऊ आणि नम्र असून आपल्या धर्मासह इतर धर्माबद्दल ही त्यांच्यात आदरभाव दिसून येतो. अशा या अँग्री पत्रकार,सहिष्णू धार्मिक प्रवचनकार आणि समाजाची नस ओळखून राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण ठरलेल्या या खऱ्या धर्मगुरूला ग्रामगौरव परिवाराकडून वाढदिवसाच्या आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतांना एवढचं नमूद करता येईल...
"दुनिया में अमन प्यार के क़िस्से लिखेगा कौन
आपस में कट मरेंगे तो आखिर बचेगा कौन
होंगे ना तुम तो लाएंगे तुमसा कहाँ से हम
होंगे ना हम तो आपको भाई कहेंगा कौन ? "
[ लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुद्धा आहेत.]