top of page
महापुराच्या संकटावर मात, सर्वांना घरकुल, शिक्षणाच्या सुविधा आणि बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण असं सर्वांगीण विकासाचे व्हिजन असणाऱ्या बोकळझर व गावचे सरपंच राहूल गावित यांची ही भन्नाट गोष्ट. गावासाठी शासनाची घरकुल योजना होती, मात्र ती राबवली गेली नव्हती. गावाची कमी लोकसंख्या आणि गरज हे मुद्दे शासनदरबारी योग्य रीतीने मांडून राहुल गावित यांनी गावासाठी घरकुल योजनेअंतर्गत मिळणारा संपूर्ण कोटा एकाच वेळी मंजूर करून घेत एका वर्षातच गावात सत्तर घरकुले उभी केली. घरकुल योजनेचा अशाप्रकारे संपूर्ण लाभ एकाच वर्षात मिळवणारी बोकळझर ही महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. अन्यथा ही योजना एका वर्षात पाच सात घरे, पुढच्या वर्षी आणखी पाच सात घरे अशा प्रकारे क्रमाक्रमाने मंजूर होते. एकाच वेळी सर्वांना हक्काचा निवारा मिळाल्याने गावातला एकोपा आणि समाधान टिकून राहण्यास मदत झाली.
ree

महाराष्ट्राच्या आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका. या तालुक्यात रंगावली नदीकाठी वसलेलं आणि १०० टक्के आदिवासी लोकवस्ती असलेलं लहानसं गांव बोकळझर. उर्वरित महाराष्ट्रातील बहुतेकांना या गावाचं नावही कदाचित आत्ताच माहित झालं असेल. परंतु, जेमतेम २९० उंबऱ्यांच्या या गावाने गेल्या काही काळात घेतलेली प्रगतीची झेप थक्क करेल अशीच आहे. या प्रगतीचे शिल्पकार आहेत गावाचे सुशिक्षित युवा सरपंच श्री. राहुल गावित आणि त्यांची व्हिजन.


स्मार्ट व्हिलेज म्हणून पुरस्कार प्राप्त केलेल्या या गावाने पुराच्या संकटावरही स्मार्टली मात करत पुढच्या स्तरावरही पुरस्कार पटकावण्याची जिद्द दाखवली आहे. सन २०१५-१६ मध्ये बोकळझरचे तरुण सरपंच श्री. राहुल गावित यांनी आपले गांव स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत सहभागी करावयाचे असा निर्णय घेतला. गावच्या माजी सरपंचांनी ग्रामपंचायत इमारत, शाळा इमारत, रस्ते असे मूलभूत काम करून बरीचशी पायाभरणी केलेली होती. मग उर्वरित कामाची धुरा अंगावर घेत नव्या सरपंचानी कामाचा धडाका सुरु केला. गावासाठी शासनाची घरकुल योजना होती, मात्र ती राबवली गेली नव्हती. गावाची कमी लोकसंख्या आणि गरज हे मुद्दे शासनदरबारी योग्य रीतीने मांडून श्री. राहुल गावित यांनी गावासाठी घरकुल योजनेअंतर्गत मिळणारा संपूर्ण कोटा एकाच वेळी मंजूर करून घेत एका वर्षातच गावात सत्तर घरकुले उभी केली. घरकुल योजनेचा अशा प्रकारे संपूर्ण लाभ एकाच वर्षात मिळवणारी बोकळझर ही महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. अन्यथा ही योजना एका वर्षात पाच सात घरे, पुढच्या वर्षी आणखी पाच सात घरे अशा प्रकारे क्रमाक्रमाने मंजूर होते. एकाच वेळी सर्वांना हक्काचा निवारा मिळाल्याने गावातला एकोपा आणि समाधान टिकून राहण्यास मदत झाली.


गांव लहानसे असले तरी, स्वच्छतेच्या बाबतीत गावकरी प्रथमपासूनच सजग असल्याचे श्री. गावित आवर्जून नमूद करतात. साधारण २०११-१२ या काळापासूनच गावकरी कुडाचा, काटक्यांचा निवारा बांधून त्यात शौचालयाची व्यवस्था करत होते. उघड्यावर शौचाचे प्रमाण तेव्हापासूनच अत्यल्प होते. आता तर प्रत्येक घराला स्वतंत्र शौचालय आहे आणि गावाने उघडी गटारे, पसरलेल्या कचराकुंड्या यांचेही निर्मूलन करत स्वच्छतेची परिमाणे निश्चित केली आहेत.


सन २०१६ पासून बोकळझर केंद्र शासनाच्या स्मार्ट व्हिलेज योजनेत सहभागी झाले. गावातील युवकांसाठी व्यायामशाळा, बालोद्यान, क्रीडांगण अशा अनेक उपक्रमांना गावात सुरुवात झाली होती. गाव नवे रूप घेत आकार घेत होतं. गावातील शाळेत ई लर्निंग सुविधा, एकही विद्यार्थी शाळाबाह्य नाही. सुंदर बोलक्या चित्रांनी, अक्षरांच्या तक्त्यांनी सजलेली स्वच्छ इमारत असलेली अंगणवाडी, ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार ऑनलाईन, ग्रामसभेची संपूर्ण माहिती एसएमएसद्वारे गावकऱ्यांना देण्याची व्यवस्था, अंमलबजावणी केलेल्या योजनांची खर्चासह माहिती, शासनाच्या सुकन्या योजनेसारख्या योजनांबाबत गावकऱ्यांना माहिती देणे, महिला सक्षमीकरण, ग्रामस्वच्छतेच्या निकषांची पूर्तता अशा अनेक गोष्टींमधून दायित्व, व्यवस्थापन आणि पारदर्शकता या कसोट्यांवर गावाने उत्कृष्ट कामगिरी करत गावाने सन २०१६-१७ मध्ये तालुका पातळीवर स्मार्ट सिटी स्पर्धेचा १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार पटकावला. आता पुढे जिल्हा स्तरावर नवापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी बोकळझरची होती.

ree

"माणसाच्या मनात अनेक मनोरथ असतात, पण दैवाच्या मनात काय आहे याचा थांग लागत नाही," श्री. राहुल गावित सांगत होते. "राज्यस्तरीय स्पर्धेची तयारी करत असतानाच नदीकाठी असलेली आमच्या गावाला महापुराचा फटका बसला. अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत सगळं सगळं पाण्याखाली गेलं होतं. जवळपास ३५ घरांमध्येही पाणी शिरलं. गुरं-जनावरं वाहून गेली. सुदैवाने सगळे ग्रामस्थ सुखरूप होते. ग्रामपंचायतीमध्ये असलेलं दप्तरच नष्ट झालं होतं.अशा वेळी ग्रामपंचायतीमध्ये कॉम्पुटर ऑपरेटरचं काम करणाऱ्या गावातीलच सुनील गावित या युवकाची दूरदृष्टी कमी आली. त्याने सर्व दप्तरातील कागदपत्रे पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवल्यामुळे पुढे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. याच वाचलेल्या ऑनलाईन कागदपत्रांमुळे स्मार्ट व्हिलेज स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत सन २०१८ मध्ये पुरानंतरही सहभाग घेता आला आणि त्या स्पर्धेतही आमच्या गावाने ४० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार पटकावला."


याच पुराच्या कठीण काळात गावकऱ्यांनी मात्र एकोपा आणि सहकार्याची भावना जागी ठेवली आणि एकमेकांना मदतीचा हात देत संकटातून सावरायला सहाय्य केलं. सांघिक भावनेने काम करून संपूर्ण गावातील गाळ स्वच्छ करण्यासाठी आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी झटून काम केलं. पाण्याने वाहून नेलेले स्मार्ट व्हिलेज पुन्हा साकारण्याचा गावकऱ्यांनी निर्धार केला आणि अवघ्या ४५ दिवसांत पुराच्या खुणा पुसून गांव पूर्वपदावर आलं. सगळ्या ग्रामसेवकांनी गावकऱ्यांचे गट करून संपूर्ण गावातील स्वच्छतेची जबाबदारी घेऊन ती पार पाडली. जनावरांचे, भटक्या कुत्र्यांचे मृतदेह वेळच्या वेळी पुरून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे गावात दुर्गंधी आणि संसर्ग पसरण्यास मज्जाव झाला. पाणी शुद्ध करण्याच्या औषधांचे वाटप करून रोगराई टाळण्यात आली. शासकीय मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न करून प्रत्येक मृत जनावरामागे तीस हजार रुपयांची आणि प्रत्येक आपत्तीग्रस्त घराला तातडीचा मदतनिधी म्हणून पाच हजार रुपयांचे सहाय्य शासनाकडून मिळवून देण्यात आले. शासनाच्या आरोग्य विभागानेही तातडीची सेवा देऊन मोठे सहकार्य केले. गावकऱ्यांनी निर्धाराने आणि परस्पर सहकार्याने केलेलं हे काम म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचा आदर्श म्हटला पाहिजे.


स्मार्ट व्हिलेज असलेलं बोकळझर महिला सक्षमीकरणाच्या बाबतीतही स्मार्ट ठरत आहे. बचतगटातील महिलांना विविध कौशल्य प्रशिक्षण देणे असो किंवा आरो फिल्टरच्या साह्याने उत्पन्नाचे साधन देणे असो, महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुरेपूर उपक्रम राबवले जात आहेत. बोकळझरच्या पंचक्रोशीतील सगळी गांवे आदिवासी गांवे आहेत. बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न आहे. मात्र, बोकळझरमधील पाणीपुरवठा विद्द्युत पंपांवर अवलंबून नाही. सौर पंपांच्या व्यवस्थेमुळे वीज गेली तरी गावात पाणीपुरवठा खंडित होत नाही. या आजूबाजूच्या गावांमधील महिला बोकळझरमधील बचतगटाच्या जल शुद्धीकरण प्रकल्पातून पाणी घेऊन जातात. त्यामुळे हे आरो फिल्टर प्लॅंट बचत गटांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत ठरले आहेत. मुंबईत दरवर्षी भरणाऱ्या 'महालक्ष्मी सरस' या बचतगटांच्या भव्य प्रदर्शनही गावातल्या महिलांनी भेट दिली होती. हा अनुभव त्यांना खूप मार्गदर्शक ठरला. गावात मंजूर करून घेण्यात आलेल्या दारूबंदीच्या ठरावामुळे गावातील व्यसनमुक्तीचे सकारात्मक परिणामही महिलांच्या दैनंदिन जीवनावर दिसत आहेत.

ree

कोविड काळात तर बोकळझर गाव वैशिष्ट्यपूर्ण ठरले असेच म्हणावे लागेल. गावात जनजागृती कार्यक्रम घेतले गेले. मास्क वाटप केले गेले. मास्क, सॅनिटायझर यांचा वापर कसा करायचा आणि त्याचे महत्त्व काय आहे याबद्दलही जनजागृती करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये स्वतः सरपंच राहुल गावित आणि त्यांचे वडील हे दोघे वगळता कोणीही गावकरी कोरोनाबाधित झाले नाहीत. तिसऱ्या लाटेतही केवळ दोन ग्रामस्थांना कोविडची लागण झाली परंतु ते योग्य उपचारांनी यातून सुखरूप बाहेर आले. संपूर्ण गावात एकही व्यक्ती कोरोनामुळे दगावली नाही. राहुल गावित याचे श्रेय वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या आदिवासी बांधवांच्या पारंपरिक ज्ञानाला देतात. झाडपाल्याची अनेक रामबाण औषधे जुन्या गावकऱ्यांना ठाऊक असल्याने त्यांना ही महामारी धक्का लावू शकली नाही, असे ते सांगतात.


गावातल्या तरुणांना आणि मुलांनाही शिक्षणाचे महत्त्व पटले आहे. गावातील बहुतांश मुले नाशिक किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये शिकायला जातात. कोरोनाकाळात शहरांमध्येच अडकून राहिलेल्या या मुलांना गावातून सर्व जीवनावश्यक वस्तू आणि सुविधा पुरवल्या गेल्या. संपूर्ण तालुक्यातील मुलांना सर्वांच्या सहकार्याने अशी मदत या संकटकाळात पुरवण्यात आली.


अशा प्रकारे गावातल्या प्रत्येक घटकाची अशी आपुलकीने काळजी घेणाऱ्या या गावाने २०१८ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील पं. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून १४ गावांची निवड करण्यात आली होती. त्यात नवव्या क्रमांकावर असलेल्या बोकळझरने या पुरस्काराचा मान मिळवला. दैनिक लोकमतचा उत्कृष्ट ग्रामविकासासाठी असलेला सन्मानही बोकळझरला मिळाला आहे. ग्रामविकासाच्या मार्गावर चालताना गावातील आबालवृद्धांचा विचार करून सर्वांना सामावून घेत पुढे जाणाऱ्या या गावाने त्याच्यासारख्या छोट्या छोट्या गावांसमोर नक्कीच एक आदर्श उभा केला आहे.


 
 
bottom of page