
पुणे - प्रगतिशील लेखक संघाची पुणे जिल्हा कार्यकारिणी निवडीची बैठक नुकतीच एस.एम.जोशी फाउंडेशन पुणे येथे घेण्यात आली. बैठकीत संघाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून मैत्री प्रकाशनाच्या मोहिनी कारंडे यांची तर लेखक, मराठी साहित्याचे अभ्यासक व न्यू इरा प्रकाशनाचे संपादक आशिष शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. सोबतच कार्याध्यक्ष म्हणून भाऊसाहेब आजबे व उपाध्यक्ष म्हणून मुक्ता कदम यांची निवड करण्यात आली. सदर बैठकीसाठी पुणे शहर परिसर आणि जिल्ह्यातून महत्त्वाचे लेख, कवी अभ्यासक उपस्थित होते. प्रगतिशील लेखक संघाचे राज्य कार्याध्यक्ष येशू पाटील,राज्य सचिव राकेश वानखेडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सरफराज अहमद, पश्चिम संघटक साहिल कबीर , लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते केशव वाघमारे, युवा साहित्य अकादमी प्राप्त लेखकराहुल कोसंबी, कवी वीरा राठोड, सुदाम राठोड, ग्रामगौरव मासिकाचे मानद संपादक दयानंद कनकदंडे, कवी व फिल्मकार हृदयमानव अशोक यासह अनेक कवी-लेखक उपस्थित होते.
प्रगतिशील लेखक संघ ही देशभरातील लेखक,कवी व साहित्य व्यवहारातील कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची रचनात्मक काम करणारी संस्था आहे. क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक सज्जाद जहीर यांच्या द्वारा स्थापन झालेल्या आणि मुंशी प्रेमचंद सारख्या दिग्गज साहित्यिकाचे नेतृत्व लाभलेल्या या संस्थेने आज ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. भारताच्या २९ राज्यांमध्ये तिचा विस्तार असून त्यात महाराष्ट्र हे देखील एक आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात विविध प्रकारच्या सांस्कृतिक व वाङ्मयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मानस सदर कार्यकारिणीने व्यक्त केला आहे. पुस्तक प्रकाशन ,परिसंवाद, परिचर्चा ,युवा महोत्सव, संमेलन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून विविध प्रगतिशील घटकांना सामावून घेण्याचा मानस यावेळी मोहिनी कारंडे यांनी व्यक्त केला . नवनियुक्त सचिव आशिष शिंदे यांनी प्रगतीशील विचारांच्या पत्रकार,चित्रकार,छायाचित्रकार,कवी, लेखक,ब्लॉगर्स ,रॅपर्स, नाट्यकर्मी, सिनेकर्मी या सर्व घटकांना संघटनेच्या माध्यमातून एका मंचावर आणण्याची ग्वाही दिली असून प्रगतीशील घटकांनी या संस्थेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.


