Updated: Jan 13, 2023
प्रत्येक ग्राम म्हणजे सर्वसत्ताधीश अशी पंचायत झाली पाहिजे. प्रत्येक ग्राम हे स्वयंपूर्ण आणि आपला सर्व कारभार चालविण्यास समर्थ असले पाहिजे. 'खरा भारत खेड्यांमध्ये वसतो'असे गांधींजींचे विचार होते. आज ग्लोबल व्हिलेज' ही संकल्पना नव्याने मांडली जात असताना; गांधीजींचे ग्रामविकासाचे विचार किती दूरदृष्टीचे होते, हे जाणून घेण्याची गरज आहे. ग्रामविकासाच्या विधायक कार्यक्रम ह्या लेखात त्यांचे ग्रामसफाई आणि स्वच्छता यासंबंधी विचार जाणून घेऊयात...
१) ग्रामसफाई :
बुद्धि आणि श्रम यांचा विच्छेद झाल्यामुळे आपल्या खेड्यांकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. आणि त्यामुळे देशभर ठिकठिकाणी जी सुंदर खेडी पसरलेली असावयाची त्याऐवजी आपल्याला उकिरडे दृष्टीस पडतात. पुष्कळ खेड्यांच्या जवळ जाऊन पोहोचताना जो अनुभव येतो त्याने मन काही प्रफुल्लित होत नाही. त्यांच्या भोवताली अशी काही घाण व त्रासदायक दुर्गंधी असते की, माणसाला पुष्कळदा डोळे मिटून नाक दाबून धरावेसे वाटते. जर काँग्रेसवाद्यांपैकी बहुसंख्य लोक आपल्या खेड्यांतील असतील तसे ते असले तर पाहिजेतच, तर त्यांना आपल्या खेड्यांतील लोकांच्या रोजच्या जीवनाशी आपण समरस होणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी कधी मानलेले नाही. राष्ट्रीय किंवा सामाजिक स्वच्छतेची जाणीव असणे, हा आमच्यांत आवश्यक सद्गुण मानलेला नाही. आपण कशा तरी प्रकारचे स्नान करतो खरे, परंतु ज्या विहिरीत, तलावांत किंवा नदीत किंवा ज्यांच्या काठी आपण स्नानादि धार्मिक विधि करतो ती घाण झाली तर आपल्याला त्याची पर्वा नसते. यो दोषाला मी एक मोठा दुर्गुण मानतो; आणि आमच्या खेड्यांची व पवित्र नद्यांच्या पवित्र काठांची जी लाजिरवाणी स्थिती आहे तिला आणि अस्वच्छतेमुळे जे नाना प्रकारचे रोग उद्भवतात त्यांना हा आपला दुर्गुणच कारणीभूत आहे.
काही नियम :
• अत्यंत शुद्ध विचार मनांत आणत जा आणि सर्व रिकामटेकड्या व मलिन विचारांची हकालपट्टी करा.
रात्रंदिवस स्वच्छ व ताजी हवा घ्या.
• शारीरिक व मानसिक श्रमात समतोलपणा राखा.
• ताठ उभे रहा, ताठ बसा आणि आपल्या एकूण एक कामांत व्यवस्थित आणि निर्मळ रहा. आणि ही सर्व कामे तुमच्या आंतरिक स्थितीची निदर्शक होऊ द्या.
२) आरोग्य आणि स्वच्छतेचे शिक्षण
निरोगी शरीरांत निरोगी मन (वास करते) हा मानवजातीसाठी कदाचित पहिला नियम असावा. या नियमांतील सत्य स्वतः सिध्द आहे. मन आणि शरीर यांच्यामध्ये अनिवार्य असा संबंध आहे. आपली मने जर निरोगी झाली तर आपण सर्व प्रकारच्या हिंसेचा त्याग करु, आणि मग स्वाभाविकपणेच आरोग्याच्या नियमांचे पालन करु म्हणजे आपली शरीरे अनायासें निरोगी होतील. म्हणून विधायक कार्यक्रमाच्या या बाबींकडे कोणताही काँग्रेसवादी दुर्लक्ष करणार नाही. अशी मी आशा बाळगतो. आरोग्य आणि स्वच्छतेचे सिद्धांत फार सोपे व सहज शिकून घेण्यासारखे आहेत. अडचण काय ती ते पाळण्याच्या बाबतीत येते. आपल्या मानव बांधवांच्या सेवेसाठी जगण्याकरिता खा. स्वतःच्या स्वादतृप्तीसाठी खाऊ - जगू नका. एवढ्यासाठी तुमचे मन व शरीर यांना सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक असेल इतकाच तुमचा आहार असावा.



