आ.शिरीष चौधरीच्या नागपुरातील कव्वालीची चर्चा महायुती सरकारच्या ढोंगी कारभारावर काँग्रेसचा निशाणा
- दस्तगीर खाटीक
- Dec 15, 2023
- 2 min read

• दस्तगीर खाटीक •
निंभोरा, ता.रावेर (बातमीदार) -
महायुती सरकार शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अजिबात संवेदनशील नाही. सरकारचा ढोंगी कारभार असून सत्ताधारी लोकांवर काँग्रेसचे लक्ष असून सरकार काय करते याची खबर आम्ही ठेवतो,असा संदेश देत काँग्रेसचे जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष चौधरी यांनी नागपूर येथे अधिवेशन काळात पक्षाच्या एका गेट टुगेदर कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्यांसमोर कव्वाली सादर करत निशाणा साधला.
आ.चौधरी यांचा कव्वालीचा अंदाज आणि नेत्यांनी दिलेली दाद नागपूर पासून जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबत असे की,सद्या राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन संत्रानगरी नागपुरात सुरु आहे. आ.शिरीषदादा यांच्यावर तीन महिन्यात दुसऱ्यांदा हृदयाच्या एन्जॉप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्याने त्यावरील पुढील आयुर्वेदिक उपचारासाठी त्यांना मुंबईत राहावे लागत असल्याने अधिवेशनाला त्यांची उपस्थिती राहणार नाही अशी शक्यता होती. पण जिल्ह्यातील अवकाळी पाऊस,पीकविम्याचा घोळ व केळी पीकविम्याची नाकारलेली प्रकरणे आदी विषय लक्षात घेऊन विधानसभेतील जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाचे आमदार असल्याच्या जबाबदारीने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही व ते थेट नागपूरात अधिवेशनाला पोहचले.दरम्यान,विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वेडट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांसाठी गेल्या बुधवारी गेट टुगेदर आयोजित केले होते.या कार्यक्रमाला पक्षाचे प्रांताध्यक्ष आ.नाना पटोले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात,माजी मंत्री नितीन राऊत,विश्वजीत कदम, आ.प्रणिती शिंदे,आ.लहू कानडे या प्रमुखांसह विधानसभा व विधानपरिषदेचे सर्वच आमदार उपस्थित होते.

आ. शिरीष चौधरी यांनी जिल्ह्यातील पीकविमा अवकाळीची नुकसान भरपाई आदी मुद्दयांवर दोन दिवस सभागृहात आवाज उठवला व शेतकऱ्यांच्या अडचणींना वाचा फोडली.यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एकही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहणार नाही अशी घोषणा केली,मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे केव्हा येतील याचा उलगडा अधांतरीच राहिला असल्याने आ.शिरीष चौधरी यांनी काँग्रेस पक्षाच्या आमदारांसाठी आयोजित गेट टुगेदर कार्यक्रमात थेट कव्वाली गात सत्ताधारी सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला.
छुपे रुस्तम है,सबकी खबर रखते है -
काँग्रेसच्या सर्व आमदारांची सत्ताधारी सरकाराचा ढोंगीपणा आणि भंपकगीरी तसेच पक्षाची भूमिका यावर चर्चा रंगात आली आणि आ. शिरीष चौधरी यांच्यातील गायक जागा झाला.कार्यक्रमात असलेल्या प्रोफेशनल गायकाला बाजूला सारत त्यांनी थेट माईकचा ताबा घेत 1973 साली आलेल्या छुपा रुस्तम या चित्रपटातील गीतकार एस.डी.बर्मन आणि मन्नाडे यांनी गायलेल्या देवआनंद यांच्या भूमिकेने तुफान लोकप्रिय ठरलेल्या...
हम छुपे रुस्तम हैं,
क़यामत की नज़र रखते हैं
ज़मीं तो क्या है,
आस्मां की ख़बर रखते हैं
हम,छुपे रुस्तम हैं ...
ही कव्वाली अगदी गायकाच्या अंदाजात गायली.यावेळी उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांनी मनमुराद दाद दिली तर काही आमदारानी ठेका सुद्धा धरला.नागपूरातील आमदारांच्या कार्यक्रमाची आणि त्यातील आ. शिरीष चौधरी यांची कव्वाली याची चर्चा जळगाव जिल्ह्यासह रावेर मतदारसंघात सुरु आहे.
Comments