top of page

कोरोनाला वेशीवर रोखणारे कढोली गाव

Updated: Jan 13, 2023

गावात कोरोना येऊ नये म्हणून सर्वांनी एकजुटीने निर्णय घेऊन त्याला वेशीवरच थांबवण्याचा निर्धार केला. शासनाकडून मदत येण्याची वाट न पाहता गावच्या सरपंचांनी उपाययोजना करून गावाला कोरोनापासून दूर ठेवले. शेवटी कोरोनाने गावाच्या एकजुटीपुढे हात टेकून पळ काढला. आज या गावाने कोरोनाला हद्दपार केले आहे. गावच्या सरपंच प्रांजल वाघ यांच्या पुढाकाराने हे सर्व झाले आणि गावात आनंदीआनंद झाला.
ree

कोरानात शासनाकडून मदत मिळत नसल्याने अनेक ठिकाणी आरोग्य सेवा अपुरी पडली. पण सर्व ठिकाणी शासन कामी येऊ शकत नाही. त्यामुळे गावाने आरोग्यसेवेत स्वयंपूर्ण होण्याचा ध्यास घेतला. नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कढोली या पाच हजार लोकवस्तीच्या गावातील लोकांनी एकत्र येऊन कोरोनाशी दोन हात केले. सर्वत्र ही महामारी धुमाकूळ घालत असताना कढोलीकरांनी एकत्र येऊन गावाच्या आरोग्यासाठी लढा दिला अन् कोरोनाला वेशीवरच रोखण्याचा जबरदस्त पराक्रम गाजविला !


लोकवर्गणी जमा करुन आरोग्य सेवेसाठी आवश्यक गोष्टींची खरेदी करण्यात आली. गावातील शाळेमध्ये सुमारे २० खाटांचे कोविड सेंटर साकारण्यात आले. गावकऱ्यांनी सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करावा तसेच शारीरिक अंतर ठेवावे, यासाठी जनजागृती करण्यात आली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, गावातील लोकांनी सर्व नियम पाळण्यास प्राधान्य दिले. याचा परिणाम म्हणून कढोली गावामध्ये गेल्या दीड वर्षात फक्त १५ जण कोरोनाग्रस्त झाले आणि केवळ एकाचा यामुळे मृत्यू झाला. कढोली गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विशेष समिती आणि गावकऱ्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नामुळे हे यश लाभले.


कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात कढोलीतील नागरिक दहशतीखाली होते. तेव्हा सरपंच प्रांजल वाघ यांनी माजी सरपंच, सदस्य यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचे अनुभवाचे बोल ऐकून उपाययोजना करण्यास कंबर कसली. त्यांनी कोरोना रोखण्यासाठी विशेष समिती स्थापन करून लोकवर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या तासाभरात लोकांनी ७० हजार रुपये जमा केले. याच पैशातून समितीने गावातील शाळेत २० खाटांचे कोरोना सेंटर सुरू केले. दक्षता म्हणून तीन ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करुन तेथे ठेवण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातून दररोज एक डॉक्टर या केंद्रात व्हिजिट करेल, अशी व्यवस्था केली. यानंतर समितीने गावकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून गावकऱ्यांना कोरोनाच्या बाबतीत सूचना केल्या. कोणतीही नकारात्मक गोष्ट पसरणार नाही, याची काळजी घेतली. अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर टाकण्यास बंदी घातली.


तरुण मुले एकत्र येऊन गप्पा मारताना दिसल्यावर त्यांना असे करण्यास मनाई केली. न ऐकणाऱ्यांची पोलीस तक्रार करून त्यांच्यावर कारवाई केली अन् दंडही वसूल केला. त्यातून जमा झालेल्या ८ हजार रुपयांतून ग्रामपंचायतीने पोलीस ठाण्यास सॅनिटायझर मशीन भेट दिले. गावात दररोज हायपोक्लोराईडची फवारणी केली. त्यामुळे गाव निर्जंतुक राहण्यास मदत झाली. तसेच गावात तीन वेळा कोरोना तपासणीचे शिबिर घेण्यात आले.

कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखण्याचे श्रेय सरपंच प्रांजल वाघ यांना जाते. त्यांनी स्थापन केलेल्या विशेष समितीने नियोजनपूर्वक कार्य केले आणि नागरिकांनी नियम पाळून त्यांना मोलाची साथ दिली. या जोरावर ‘गाव करील ते राव करील काय' ही म्हण कढोलीवासियांनी खरी करून दाखवली.


गावाला मिळाली लाखोंची बक्षीसे

कढोली गावाने कोरोनाच्या महामारीविरोधात मिळवलेल्या यशाबद्दल अनेक ठिकाणी गौरव झाला. त्यामुळे गावाचे नाव राज्यभर गेले. कढोली गावात प्रवेशद्वारापासून ते शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी... असे सारे काही स्वच्छ अन् सुंदर आहे. केंद्र शासनाच्या पंचायत सशक्तीकरण स्पर्धेचे आठ लाखांचे बक्षीस ग्रामपंचायतीने पटकावले असून, राज्य पातळीवर तब्बल ७० लाखांची बक्षिसेदेखील आपल्या नावे केली. कढोलीवासियांनी शेजारील गावालाही मदत केल्याने तेदेखील कोरोनामुक्त होत आहे.


शंभर टक्के लसीकरण

गावामध्ये जवळपास सर्वच नागरिकांनी लस घेतली आहे. अगोदर वयाची साठी ओलांडलेल्या नागरिकांना लस देण्यात आली. त्यानंतर ४५ व १८ वर्षे वगोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कढोली गावाने १०० टक्के लसीकरण साध्य करण्याचा पराक्रम नोंदविला आहे.


कामाला जाणाऱ्यांना मास्क, सॅनिटायझेशन बंधनकारक

कढोली गावातील सुमारे ५०० जण गावानजीकच्या विविध कंपन्यांमध्ये दरारोज कामाला जातात. साहजिकच त्यांचा अनेक कामगारांशी बोलणे, भेटण्याच्या माध्यमातून संबंध येतो. यामुळे त्यांचेही नेहमी सॅनिटायझेशन केले जाते. याशिवाय त्यांना मास्क बंधनकारक केला आहे. मास्कशिवाय ते गावात प्रवेश करू शकत नाहीत.

ree


( शाश्वत माध्यम ) ई-मेल : trustysms@yahoo.com


Comments


bottom of page